नाटक हा समाजाचा आरसा: पद्मश्री सतीश आळेकर


 नाटक हा समाजाचा आरसा: पद्मश्री सतीश आळेकर 


रमणबाग प्रशालेत जागतिक रंगभूमी दिन उत्साहात साजरा 




नाटक हा समाजाचा आरसा असतो. समाजात घडणाऱ्या विविध घटना आणि प्रवृत्ती यांचे प्रतिबिंब नाटकात उलटे सुलटे किंवा तिरके अशा कोणत्यातरी स्वरूपात निश्चितपणे दिसून येत असते. कलाकाराने आपल्या कलाकृतीतून नेमके काय मांडायचे, हे विचार करून ठरवायचे असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार, पटकथाकार आणि दिग्दर्शक पद्मश्री सतीश आळेकर यांनी केले. 


रमणबाग प्रशालेत जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सदानंद आचवल स्मृत्यर्थ पुरस्कार वितरण आणि आजी-माजी विद्यार्थी कलाकारांच्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी रोटरी इंटरनॅशनलच्या मानव विकास विभागाचे संचालक डॉ. दिलीप देशपांडे, डॉ. विनय कुमार आचार्य, नामवंत संगीतकार अजय पराड, व्हायोलिन संगीत संस्थेचे संस्थापक पं. अतुलकुमार उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते. 


या वेळी रमणबाग प्रशालेच्या वतीने सतीश आळेकर यांना सन्मानाचा जनस्थान पुरस्कार मिळाल्याबद्दल मानपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे विख्यात नाट्य रसिक सदानंद आचवल यांच्या स्मृत्यर्थ त्यांचे मित्र अमेरिका येथील नाट्यप्रेमी अनिल प्रयाग यांनी नाट्य क्षेत्रात आश्वासक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या पुरस्कारांचे वितरण आळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्युष महामुनी या विद्यार्थ्याला नाट्य आराधना पुरस्कार तर आयुष दुसाने याला नाट्य प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 


संपूर्ण देशभरात मराठी नाटक हे आघाडीचे आणि प्रयोगशील मानले जाते. सध्या नाटकांना सुगीचे दिवस आहेत. नाट्य क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना आणि येऊ इच्छिणाऱ्यांना देखील नाटकांमध्ये आपण नेमके काय करायचे, याची स्पष्ट जाणीव असणे आवश्यक आहे. लोकप्रिय नाटक करायचे की अधिक चांगले नाटक करायचे याची निवड करण्याची वेळ त्यांच्यावर केव्हा ना केव्हा येणार आहे, असे आळेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. 


नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी पुरस्कार देण्याची इच्छा असलेले अनिल प्रयाग आणि अनेक नावंत कलाकारांना घडविणारी रमणबाग प्रशाला यांच्यातील दुवा म्हणून आपण भूमिका बजावली आहे. या पुरस्काराचे श्रेय आपले नाही, असे डॉ.  देशपांडे यांनी विनयपूर्वक नमूद केले. तरुणांमध्ये नवकल्पनांची ऊर्जा प्रचंड प्रमाणात असते. या ऊर्जेला अनुभवांच्या शिदोरीची जोड मिळाली तर कल्पना प्रत्यक्षात येऊ शकतात. त्यासाठी कल्पक विद्यार्थ्यांनी रोटरी इंटरनॅशनल सारख्या संस्थांशी संपर्कात रहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 


या कार्यक्रमात डॉ. आचार्य, अजय पराड यांनी देखील मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई यांनी प्रास्ताविक केले. सुहास देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले तर रवींद्र सातपुते यांनी आभार मानले. 


विनोदाला रागावण्यापेक्षा अंतर्मुख व्हा


सध्या एका विडंबनात्मक गाण्यामुळे राजकीय क्षेत्रात उठलेल्या वादळाचा संदर्भ घेऊन आळेकर यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राला विनोदाची आणि विडंबनाची मोठी परंपरा आहे. गाढवाचं लग्न आणि इच्छा माझी पुरी करा अशा कार्यक्रमांमध्ये तत्कालीन पुढारी समोर बसलेले असताना त्यांच्यावर राजकीय कोटी करण्यात येत असे. त्याच्यावर न रागवता ते नितळ हसण्याने त्याला दाद देत. विनोदाला रागवण्यापेक्षा त्यामुळे अंतर्मुख होणे जास्त महत्त्वाचे आहे. सध्याच्या काळात ही सहनशीलता, सहिष्णुता कोठे आहे, याचा राजकारण्यांनी विचार करावा आणि कलाकारांनी देखील कर्मणूक म्हणजे केवळ विनोद आहे की त्यातून काही सर्जनशील साधायचे आहे याचा विचार करावा, अशा शब्दात आळेकर यांनी दोघांचेही कान टोचले.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष श्री. दीपक माधवराव मानकर यांना विधानपरिषदेची आमदारपदी संधी न दिल्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी दिला सामुहिक राजीनामा