प्रोत्साहनासाठी कार्यकर्त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप गरजेची
प्रोत्साहनासाठी कार्यकर्त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप गरजेची
- पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन; अठराव्या कै. धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कारांचे वितरण
- रवी बापटले, विवेक वेलणकर, प्रतिमा जोशी, राहुल रानडे, पांडुरंग मुखडे, जावेद खान यांचा सन्मान
पुणे, ता. १८ : "समाजात निःस्वार्थ भावनेने काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत. फारसे प्रकाश झोतात न येता त्यांचे कार्य सुरु असते. अशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकायला हवी. धनंजय थोरात यांच्यासारख्या सच्चा कार्यकर्त्याच्या नावाचा पुरस्कार देऊन त्यांच्या स्मृती जागवण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे," असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कै. धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिला जाणारा २०२३ सालचा 'कै. धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार' लातूर येथील सेवालय संस्थेचे प्रमुख रवी बापटले यांना २५ हजार रूपयांचा मुख्य पुरस्कार, तर शेल्टर असोसिएट्सच्या संस्थापिका प्रतिमा जोशी, संगीत दिग्दर्शक राहुल रानडे यांना प्रत्येकी अकरा हजार रूपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर २०२२ सालाचा सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांना २५ हजार रूपयांचा मुख्य पुरस्कार, तर तबलावादक पांडुरंग मुखडे आणि कोविडमध्ये अंत्यसंस्काराचे काम करणारे जावेद खान यांना प्रत्येकी अकरा हजार रूपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, रोख रक्कम व शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. यंदा पुरस्काराचे अठरावे वर्ष होते.
नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या पुरस्कार सोहळ्याला पं. सत्यशील देशपांडे हे प्रमुख पाहुणे, तर माजी आमदार मोहन जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार, आमदार रवींद्र धंगेकर, माजी मंत्री रमेश बागवे, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, संपादक पराग करंदीकर, सौ. थोरात, काँग्रेसचे पदाधिकारी दत्ता बहिरट, प्रथमेश आबनावे, शिरीष बोधने आदी उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "समाजासाठी भरीव योगदान देणाऱ्या या व्यक्तिमत्वाना शोधून हा पुरस्कार दिला जातो, याचा आनंद आहे. ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या आग्रहाने माहिती अधिकार कायदा आणला गेला. या प्रक्रियेचा मीही एक भाग होतो. मात्र, आज हा कायदा अप्रत्यक्षपणे मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. प्रशासनात पारदर्शकता येण्यासाठी हा कायदा महत्वाचा आहे. काही प्रमाणात का होईना या कायद्याने अनेक विभागांत भ्रष्टाचारावर अंकुश आला आहे."
"राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी व कोणीही जे समाजाभिमुख काम करतात. त्यांनी लेखन करायला हवे. आपले अनुभव, आत्मचरित्र लिहिण्याबरोबरच वाचन करणेही तितकेच गरजेचे आहे. त्यातून आपले व्यक्तिमत्व घडत जाते. राजकीय पक्षच बदल घडवू शकतील असे नाही, तर संस्था, संघटना यांचे देखील मोलाचे योगदान आहे," असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.
पं. सत्यशील देशपांडे म्हणाले, "अभिजात संगीताचा मोठा वारसा आपल्याकडे आहे. अंतरात्म्याकडे घेऊन जाणारे हे संगीत आहे. शास्त्रीय संगीताचा पाया धरून रानडे व मुखडे यांनी कार्य केले आहे. आज संबंध नसलेली माणसे कलाविषयक निर्णय घेतात. यामध्ये आवश्यक बदल व्हायला हवेत. कला जपणाऱ्या कलावंताची शासन योग्य दखल घेईल अशी अपेक्षा आहे."
मोहन जोशी यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींची दखल राज्यात व देशांत घेतली जाते. धनंजय थोरात यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याची आठवण ठेवली पाहिजे, याच भावनेतून हा कार्यक्रम घेतला जातो. याला पक्षीय बंधन नाही. मित्र परिवार वेळ काढून हा सोहळा दरवर्षी साजरा करतो."
प्रास्ताविकात उल्हास पवार म्हणाले, "थोरात यांची सामाजिक जाण खूप मोठी होती. त्यांच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी हा पुरस्कार महत्वपूर्ण आहे. समाजासाठी झोकून देऊन समर्पित भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या निमित्ताने अनेकांचे चांगले काम समोर येते. त्यातून समाजाला प्रेरणा मिळते."
रवी बापटले म्हणाले, "प्राध्यापकी आणि पत्रकार म्हणून काम करताना मन रमले नाही. स्वच्छ्ता मोहिमेतून कामाला सुरुवात केली. एचआयव्ही ग्रस्त मुलांसाठी आयुष्य वाहून घेण्याचे ठरवले. अनेक मुले चांगल्या नोकरीला लागली, मुलींची लग्ने लावून दिली. लग्न केले नाही, परंतु मला १०० मुले, जावई आणि नातवंडेही आहेत. या मुलांमुळे माझे आयुष्य समृद्ध झाले आहे."
विवेक वेलणकर म्हणाले, "माहितीचा अधिकार प्रशासकीय व राजकीय लोकांना अडचणीचा वाटतो. अठरा वर्षे होऊनही नकारात्मक मानसिकता, शासनाची अनास्था आणि योग्य अंमलबजावणीचा अभाव यामुळे माहिती अधिकार कायदा सध्या व्हेंटिलेटरवर आहे. सव्वालाख अपील प्रलंबित आहेत. ११ पैकी केवळ चार-पाच आयुक्त आहेत. हे बदलण्याची गरज आहे."
राहुल रानडे, पांडुरंग मुखडे, जावेद खान यांनीही आपल्या भावना व्यक्त करत केलेल्या कार्याची माहिती सांगितली. स्वागत पराग करंदीकर यांनी केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. रामदास फुटाणे यांनी आभार मानले.
--------------------------------
फोटो ओळ :
एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ : 'कै. धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार' वितरण सोहळ्याप्रसंगी डावीकडून सुधीर गाडगीळ, रमेश बागवे, रामदास फुटाणे, जावेद खान, राहुल रानडे, उल्हास पवार, पांडुरंग मुखडे, पं. सत्यशील देशपांडे, पृथ्वीराज चव्हाण, विवेक वेलणकर, मोहन जोशी, रवी बापटले, रवींद्र धंगेकर.
Comments
Post a Comment