'ब्राह्मण रत्ने' या १२०० पानांच्या चरित्रकोश ग्रंथाचे प्रकाशन रविवारी (दि.२९) 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन ; आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका तर्फे कार्यक्रमाचे आयोजन



पुणे : आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका तर्फे गेल्या सुमारे २२५ वर्षांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करणा-या कर्तृत्त्ववान अशा ७०० हून अधिक राष्ट्रकायार्साठी समर्पित ब्राह्मण व्यक्तिमत्वांचा समावेश असलेला 'ब्राह्मण रत्ने' हा चरित्रकोश ग्रंथ साकारण्यात आला आहे. रविवार, दिनांक २९ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे, अशी माहिती ग्रंथाच्या संपादक मंडळाचे सदस्य असलेले ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर, ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, प्रकल्प संचालक गोविंद हर्डीकर, संजय ओर्पे व ग्रंथाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 


प्रकाशन सोहळ्यास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार प्रकाश जावडेकर, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, संपादक मंडळातील सदस्य माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आणि विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सुमारे १२०० पानांचा हा ग्रंथ तयार झाला असून ७०० हून अधिक महनीय ब्राह्मण व्यक्तींचा यात समावेश केलेला आहे. ज्यांची स्मृती या ग्रंथरुपाने कायम जतन करून ठेवली जाईल.

 


चरित्रकोश ग्रंथाच्या संपादक मंडळात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), पं. वसंतराव गाडगीळ, पंचांगकर्ते मोहन दाते, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, ज्येष्ठ समुपदेशक डॉ. श्रीराम गीत, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ विचारवंत अनिल नेने, ज्येष्ठ उद्योजक सुधीर राशिंगकर, हर्षवर्धन भावे, अनिल गानू, बँकिंगतज्ञ डॉ. मुकुंद अभ्यंकर, प्रवचनकार सुहास कुलकर्णी, ज्येष्ठ व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे, सिरमचे संचालक केदार गोखले यांचा समावेश आहे.

 

श्रीमंत पेशवे घराण्याचे वंशज आणि लोकमान्य टिळकांचे वंशज  यांचा कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी ग्रंथासाठी विशेष सहकार्य देणारे ब्राह्मण उद्योजक उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे, पितांबरीचे रविंद्र प्रभुदेसाई, बेलराईज इंडस्ट्रीजचे श्रीकांत बडवे व सुप्रिया बडवे, श्री धूतपापेश्वरचे रणजित पुराणिक, साण्डू ब्रदर्सचे शशांक साण्डू, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे पराग गाडगीळ, युवा उद्योजक प्रशांत कारूळकर, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलींद काळे, वामन हरी पेठे ज्वेलर्सचे विश्वनाथ पेठे, गोदावरी अर्बनचे धनंजय तांबेकर, प्रावी आॅटोचे रवींद्र देवधर, अमेय इंडस्ट्रीजचे अतुल परचुरे, बुलडाणा अर्बनचे शिरीष देशपांडे, पीएनजी अँड सन्सचे अजित गाडगीळ, लोकमान्य मल्टिपर्पजचे किरण ठाकूर अशा विविध मान्यवरांचा समावेश आहे.

 

स्वातंत्र्यपूर्व काळात आणि आज स्वातंत्र्यानंतरच्या सुमारे ७५ वर्षांच्या काळात महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण देशाच्या जडणघडणीमध्ये व सामाजिक परिवर्तनामध्ये समाजातील दिवंगत सर्वच जाती-धर्मातील अनेकांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामध्ये ब्राह्मण समाजातील कर्तृत्ववान व्यक्तिंचा देखील मोठा वाटा आहे. साधारणपणे सन १८०१ सालापासून म्हणजे गेल्या २२५ वर्षातील अशा महनीय ब्राह्मण व्यक्तींचा समावेश असलेला हा चरित्रकोश आहे. भारतरत्न, बहुआयामी व्यक्तिमत्वे, स्वातंत्र्यसेनानी, राजकीय, समाजसेवा, क्रीडा, कृषी, औद्योगिक, धार्मिक, कला, संगीत, नाटक, चित्रपट यासारख्या विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या कर्तृत्ववान व्यक्तिंची सचित्र माहिती या चरित्रकोशात वाचायला मिळेल. आजच्या तरुण पिढीला या अजरामर व्यक्तीची माहिती प्रेरणादायी तर ठरेलच शिवाय खरा इतिहास सर्वासमोर येईल. महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विशेष करून स्वत:च्या समाजाचा विचार न करता कालसंगत, व्यापक, सर्वसमावेशक भूमिका घेतली. व्यक्तिगत सुखापेक्षा समाज व राष्ट्र प्रथम मानले. अद्वितीय कार्य करून ब्राह्मण समाजातील या सर्व व्यक्ती अजरामर झाल्या आहेत. त्यांच्या स्मृती या चरित्रकोशाच्या निमित्ताने जागविण्याचा हा प्रयत्न आहे.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला