*श्रीमती. पुष्पाताई नडे संचालिका-महिला व बाल विभाग, 'स्व'-रूपवर्धिनी, पुणे, आणि आम्रपाली उत्कर्ष संघ, नागपूर यांना यंदाचा 'यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर*
*श्रीमती. पुष्पाताई नडे संचालिका-महिला व बाल विभाग, 'स्व'-रूपवर्धिनी, पुणे, आणि आम्रपाली उत्कर्ष संघ, नागपूर यांना यंदाचा 'यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर*
पुणे : अनाथांची माय 'पद्मश्री' डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांचा येत्या ४ जानेवारी २०२४ रोजी दुसरा स्मृती दिवस. त्यांच्या स्मृतिदिनानमित्त प्रदान करण्यात येणाऱ्या 'यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कारा'ची घोषणा आज करण्यात आली आहे.
याविषयी माहिती देताना माईंच्या कन्या आणि 'सप्तसिंधू' महिला आधार बाल संगोपन व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधूताई सपकाळ म्हणाल्या, पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. व्यक्तिशः आणि संस्था या दोन स्वरूपात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. एखादी व्यक्ती किंवा संस्था तळागाळा पर्यंत जावून समाजासाठी काम करते तेव्हा त्याच्या कामाची दखल घेतली गेली पाहिजे, या उद्देशाने हे पुरस्कार सुरु करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी दिला जाणारा पुरस्कार हा पुण्यातील मंगळवार पेठेत असणाऱ्या 'स्व' - रुपवर्धिनी या संस्थेच्या सह कार्यवाह श्रीमती पुष्पाताई नडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. गेली ३० वर्ष पुष्पाताई या संस्थेच्या माध्यमातून महिला व बालकांसाठी काम करत आहेत. तसेच दुसरा पुरस्कार देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी कार्यरत असणारी आम्रपाली उत्कर्ष संघ, नागपूर या संस्थेला जाहीर झाला आहे. श्री. राम इंगोले यांनी ही संस्था सुरू केली असून गेल्या ३५ वर्षांपासून ही संस्था कार्यरत आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ५१ हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
गुरुवार दि. ४ जानेवारी २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे संध्याकाळी संध्याकाळी ५ वाजता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर असणार आहेत. तर भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील.
पुढे बोलताना ममता सपकाळ म्हणाल्या, मुळात निरपेक्ष भावनेने जेव्हा कोणी समाजात काम करत असतं तेव्हा त्या व्यक्तीसाठी आपण आधाराचा हात बनला पाहिजे, हे सर्वांचे कर्तव्यच आहे. यामुळे ती व्यक्ती आणखी चांगलं काम करते. तिच्या हाताला बळ मिळतं. ज्या समाजाने माईंवर भरभरून प्रेम केलं आणि माईंना इथवर आणलं आता तोच वसा पुढे नेत आहोत. माईंचा त्याग त्यांच समर्पण त्याचा वारसा जे माई आम्हाला देवून गेल्यात ते आता आम्ही इतरांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत. माईंनी सुरू केलेल्या ममता बाल सदन (सासवड), संमती बाल निकेतन (मांजरी), मनःशांती छात्रालय (शिरूर), सावित्रीबई फुले वसतिगृह (चिखलदरा) या चार ठिकाणी संस्थेचे काम सुरू आहे. जवळपास २६० मुलं मुली आपल्या संस्थेत आहेत. तसेच गायरक्षण केंद्र (वर्धा) येथे १५४ भाकड गाईंचा सांभाळ केला जात आहे.
Comments
Post a Comment