ओमराजे निंबाळकर, राजेंद्र गावीत, संजय जाधव, अशोक नेते यांना आदर्श खासदार पुरस्कार

 ओमराजे निंबाळकर, राजेंद्र गावीत, संजय जाधव, अशोक नेते यांना आदर्श खासदार पुरस्कार










जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयुस् तर्फे ७ वी युवा संसद ; भास्कर पेरे पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार


पुणे : युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्याकरीता जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयुस् तर्फे आयोजित ७ व्या युवा संसदेत ओमराजे निंबाळकर, राजेंद्र गावीत, संजय जाधव, अशोक नेते यांना आदर्श खासदार पुरस्कार आणि सरपंच भास्कर पेरे पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार यांना प्रदान करण्यात येणार आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरुप आहे, अशी माहिती इन्स्टिटयूटचे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट तर्फे रविवार, दिनांक २८ व सोमवार, दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी संस्थेच्या सभागृहात ही संसद होणार आहे. युवा संसदेत भास्कर जाधव, संजय शिरसाट यांना आदर्श आमदार पुरस्कार, हेमंत रासने, साईनाथ बाबर, दत्ता धनकवडे, गणेश बीडकर यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार, दिलीप घोलप यांना आदर्श सरपंच तर सनी निम्हण, अक्षय जैन यांना आदर्श युवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तर, अ‍ॅड.असिम सरोदे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर अधिवक्ता पुरस्कार देण्यात येणार आहे.

 

संसदेचे उद्घाटन रविवार, दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, माजी आमदार शिवाजी कर्डीले, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर उपस्थित राहणार आहेत. दुपारी ३ वाजता सामाजिक चळवळ आणि युवक याविषयावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड, माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर हे आपले विचार मांडणार आहेत.

 

सोमवार, दिनांक २९ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत याविषयावर अक्षय जैन, अ‍ॅड.असिम सरोदे, शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील, पत्रकार निलेश बुधावले मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी ११ वाजता खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांची विशेष मुलाखत होणार आहे.

 

दुपारी १२.३० वाजता भारतीय राजकारणाची ७५ वर्षे किती नैतिक किती अनैतिक याविषयावर संविधानतज्ञ प्रा. उल्हास बाटप, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई, भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर, पत्रकार साहिल जोशी हे आपले विचार मांडणार आहेत. संसदेचा समारोप दुपारी ३ वाजता होणार असून खासदार हेमंत पाटील, आमदार सुधीर तांबे आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

महाराष्ट्रातून सुमारे १५०० हजार विद्यार्थी संसदेत सहभागी होणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी संसदेत सहभागी होणार आहेत. पुणे, सोलापूर, अकोला, कोल्हापूर, मराठवाडा, कोकण यांसह विविध भागांतून विद्यार्थी संसदेकरीता पुण्यामध्ये येणार आहेत. संसदेच्या माध्यमातून युवकांनी राजकारण आणि समाजकारणातील दिग्गजांसोबत संवाद साधावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे.



Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष श्री. दीपक माधवराव मानकर यांना विधानपरिषदेची आमदारपदी संधी न दिल्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी दिला सामुहिक राजीनामा