हसत-खेळत, प्रयोगांतून विज्ञान आत्मसात करावे
हसत-खेळत, प्रयोगांतून विज्ञान आत्मसात करावे
अरविंद गुप्ता यांचे प्रतिपादन; मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्रातर्फे आंतरशालेय प्रकल्प स्पर्धा
पुणे : "पुस्तकांत लिहिले आहे किंवा मोठ्यांनी सांगितले म्हणून डोळेझाकपणे कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आपल्यातील कुतूहल, जिज्ञासा जागृत ठेवून प्रत्येक गोष्टींचा प्रात्यक्षिकांतून अनुभव घ्या आणि मग निष्कर्ष काढा. विज्ञान हे हसत-खेळत, प्रयोगांतून आत्मसात करायला हवे. निसर्गात आपल्याभोवती असलेल्या प्रत्येक गोष्टींतून काहीतरी निर्मिती करून त्यातील विज्ञान समजून घेता येते," असे प्रतिपादन प्रसिद्ध संशोधक पद्मश्री अरविंद गुप्ता यांनी केले.
भारतीय विद्या भवनच्या मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्रातर्फे आयोजित आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी अरविंद गुप्ता बोलत होते. याप्रसंगी भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे, संस्थेच्या उपसंचालिका नेहा निरगुडकर, भारती बक्षी आदी उपस्थित होते. स्पर्धेचे हे सोळावे वर्ष असून, यासाठी विविध शाळांमधून कनिष्ठ व वरिष्ठ गटातून सुमारे ३५० प्रकल्प पाठविण्यात आले होते. त्यातील निवडक ६४ प्रकल्पांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन वेकफील्ड फूड्सचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी मल्होत्रा यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेत वरिष्ठ गटात इझी पिकअप मशीन (संस्कृती स्कुल - सुरज देपुरा), लेग ऑपरेटेड हॅन्ड पंप (विखे पाटील स्मृती विद्यालय पत्रकारनगर - हृदय राळेगणकर, रजत दुत्ते, ओम कासंगोत्तुआर), बायोडिग्रेडेबल शुगरकेन बगॅस प्रॉडक्ट्स (व्ही. के. मते शाळा चिंचवड - तनुजा म्हस्के, श्रद्धा कुलकर्णी, हर्षदा धूत) या प्रकल्पांना, तर कनिष्ठ गटात ऍटोमॅटिक क्लॉथ ड्रायर ऑपरेटर (भारतीय विद्या भवनचे सुलोचना नातू विद्यामंदिर - राधा जोशी, प्रिशा शिरोडे, समृद्धी देशमुख), ब्लाइंड मॅन रोबोटिक स्टिक (सेवासदन इंग्लिश स्कुल पटवर्धनबाग - स्वरदा खटावकर, मनुश्री नामन्ना), एथिकल ऍग्रीकल्चर मॉनिटरिंग सिस्टीम (न्यू इंग्लिश स्कुल कोथरूड - आदित्य कुकडोलकर, ऐश्वर्या मिंढे, अद्वैता तेटगुरे) या प्रकल्पांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना अनुक्रमे ३०००, २१०० व १५०० रुपये रोख, मानचिन्ह, पदक व प्रमाणपत्र देण्यात आले.
अरविंद गुप्ता म्हणाले, "समृद्ध निसर्ग लाभल्याने भारतात खेळणी बनवण्याची मोठी परंपरा आहे. त्याला साजेशी खेळणी आपण बनवावीत. मुलांचे लहानपण खेळण्यात गेले नाही, तर पुढे ती उपद्रवी बनतात. 'सुंदर सलोने, भारतीय खिलोने'सारखी पुस्तके मार्गदर्शक आहेत. भवतालच्या प्रत्येक गोष्टीतून खेळणी बनवणे शक्य आहे. आपण तसा विचार केला पाहिजे. दक्षिण भारतात नारळाच्या फांद्या, करवंट्यांपासून शेकडो खेळणी बनवली जातात. मुलांनी आपल्यातील कल्पक विचार प्रत्यक्षात उतरवून मजेशीर खेळणी बनवावीत. विज्ञान प्रकल्प हे आपल्यामधील विविध कौशल्यांना चालना देत असतात. आपल्या दैनंदिन जीवनातील समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी ते प्रवृत्त करत असतात. इतकेच नव्हे तर तुमच्यातील विचारक्षमता, सर्जनशीलता आणि इनोव्हेशन यांना प्रोत्साहन देतात."
या स्पर्धेला विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नंदकुमार काकिर्डे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारती बक्षी यांनी प्रास्ताविकात प्रकल्प स्पर्धेच्या स्वरूपाविषयी माहिती दिली. नेहा धोपटे यांनी सूत्रसंचालन केले. तेजस चिंबाळकर यांनी आभार मानले.
खेळण्यांच्या तासाने मुले भारावली
पेन्सिल-खोडरबरपासून बनवलेला फॅन, चप्पल-खराट्याच्या काड्यांपासूनचे सुदर्शन चक्र, स्ट्रॉ व कात्रीच्या बनवलेली बासरी, बॅटरी सेल व कोपर व्हायरपासून बनवलेली खेळणी आदी गोष्टी प्रात्यक्षिकांतून दाखवत टाकाऊ वस्तूंमधून वैज्ञानिक खेळणी कशा साकाराव्यात, याविषयीची माहिती अरविंद गुप्ता यांनी दिली. गुप्तांच्या या 'खेळकर' व्याख्यानातून खेळण्यांच्या दुनियेची सफर अनुभवता तासाने मुले चांगलीच भारावून गेली.
Comments
Post a Comment