राज्यसभेचे उपसभापती हरिवंश : अनुवादित साहित्यामुळे देश समजून घेता येतो
अनुवादित साहित्यामुळे देश समजून घेता येतो : हरिवंश
'लोकशाहीसाठी समंजस्य संवाद'तर्फे हिंदी लेखक डॉ. दामोदर खडसे यांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कार
पुणे, दि. २४ : "भाषेतील वैविध्याने संपन्न असलेला देश समजून घेण्यात अनुवादित साहित्याचे मोठे योगदान आहे. अनुवादनामुळे प्रत्येक भाषेतील सकस साहित्य समाजासमोर आले. त्यातून वेगवेगळ्या परिसराचे, संस्कृतीचे वैशिष्ट्ये आपल्याला समजले. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, येथील संत साहित्यातून मांडलेले प्रवाह सर्वदूर पोहोचण्यात अनुवादकांची व इतर साहित्यिकांची भूमिका नेहमीच महत्वपूर्ण राहिली आहे," असे प्रतिपादन राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी केले.
लोकशाहीसाठी समंजस्य संवाद, डेमोक्रॅटिक डायलॉग पब्लिकेशन नेटवर्क आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने प्रख्यात हिंदी लेखक व ज्येष्ठ अनुवादक डॉ. दामोदर खडसे यांचा अमृत महोत्सवानिमित्त जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. सुधाकर शेंडगे संपादित 'रचना संसार के शिखर पर दामोदर खडसे' या ग्रंथाचे प्रकाशन यावेळी झाले.
संत ज्ञानेश्वर सभागृहात झालेल्या या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी एमआयटीचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार व लेखक विश्वनाथ सचदेव, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, माजी आमदार उल्हास पवार, सौ. सुमित्रा खडसे, संयोजक व ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवी चिटणीस, उपस्थित होते.
हरिवंश म्हणाले, "महाराष्ट्रातील साहित्यिक जगभर ओळखले जातात. साहित्यिकांच्या या रांगेत डॉ. दामोदर खडसे या बहुआयामी व्यक्तीचाही समावेश आहे. डॉ. खडसे हे मानवतेचे प्रवक्ते आणि निर्माते असलेले साहित्यिक आहेत. विविध भाषांना एकत्रित जोडणारा पूल बनले आहेत. पुणे ही ऐतिहासिक वारशाची भूमी असून, विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्याकडून मौलिक विचारांची पुंजी मिळते. लोकशाहीला बळकट करण्याचे काम साहित्याच्या मदतीने होते."
विश्वनाथ सचदेव म्हणाले, "ज्या समाजात लेखक-साहित्यिकांचा सन्मान होत नाही, तो देश मृतावस्थेत जातो. साहित्य समाजात मोठ्या प्रमाणावर बदल घडवून उत्तम समाज घडवू शकते. साहित्य म्हणजे समाजाला प्रकाशवाट दावणारी मशाल असते. त्या वाटेवरूनच समाज प्रगतीपथावर जात असतो."
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, "संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान आणि भगवान गौतम बुद्धांनी पंचशील लिहून मानवतेला जीवन जगण्याचा मार्ग दाखवला. संत आणि साहित्यिकांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. मूल्याधिष्ठित व सकस साहित्य समाजाला दिशादर्शक ठरते. डॉ. खडसे यांनी प्रादेशिक भाषेतील साहित्य हिंदीत आणून ते अधिक व्यापक केले."
डॉ. दामोदर खडसे म्हणाले, "छत्तीसगडसारख्या छोट्या गावात शिक्षण घेतल्यानंतर पुणे शहरात येऊन साहित्य क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. १९७८ मध्ये माझा पहिला लेख नवयुगमध्ये प्रकाशित झाला होता. यानंतर काव्यरचना, संपादन, अनुवाद आणि अन्य साहित्य निर्मिती केली. अजूनही साहित्य क्षेत्राला पूर्णत्वाने देऊ शकलेलो नाही, याची खंत आहे."
उल्हास पवार म्हणाले, "डॉ. खडसे यांनी साहित्य आणि पत्रकारितेत मोलाचे योगदान दिले आहे. देश आणि लोकांच्या भावना जोडण्यासाठी गरजेची असलेल्या हिंदी भाषेला त्यांनी अन्य भाषांशी एकरूप केले." अरुण खोरे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. सुनील देवधर यांनी केले.
Comments
Post a Comment