उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 'वंचित विकास'कडून साकडे; शासन निर्देश काढण्याची मागणी
एकल महिलांच्या सन्मानासाठी 'अभया' संबोधावे
'वंचित विकास'कडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवाहन; शासन आदेश काढण्याची मागणी
संस्थेच्या कार्यवाह व संचालक मीना कुर्लेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील नवीन विश्रामगृहात भेट घेऊन निवेदन दिले. वंचित विकास संस्थेच्या संचालक सुनीता जोगळेकर, सहकार्यवाह देवयानी गोंगले, सदस्य मीनाक्षी नवले, चैत्राली वाघ, डॉ. श्रीकांत गबाले, तेजस्विनी थिटे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते योगेश गोगावलेही उपस्थित होते.
मीना कुर्लेकर म्हणाल्या, "वंचित विकास संस्था गेली ३७ वर्षे समाजातील विविध वंचित घटकांच्या प्रगतीसाठी काम करत आहे. महिलांसाठी काम करत असताना असे जाणवले की, 'महिलांना उद्देशून आपण अनेक अपमानास्पद शब्द वापरतो; मात्र, त्या शब्दांचा त्या महिलांच्या मनावर आघात होत असतो.' ही बाब लक्षात आल्यावर आम्ही सन्मान देणारा योग्य शब्द वापरण्याबाबत विचार केला. तेव्हा ‘अभया’ हा शब्द सर्वानुमते पुढे आला. “अभया म्हणजे परिस्थितीला न घाबरता सक्षमपणे तोंड देणारी महिला होय."
या महिलांचा सन्मान करणाऱ्या विचाराला राज्यभरातून मान्यता देणाऱ्या हजारो स्वाक्षऱ्या, लेखी पत्रे आली आहेत. हे अभियान मागील दहा वर्षापासून सातत्याने सुरु असून, समाजातील विविध मान्यवरांना भेटून याची जनजागृती करत आहोत. मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही सदर निवेदन पाठवले असून, त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आलेला आहे. आजवर एकल महिलांना सन्मानाने संबोधण्यासाठी कोणीही विचार केलेला नव्हता. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारसरणीचे हे सरकार असून, धडाडीने निर्णय घेणाऱ्या पुरोगामी विचारांचे मा. मुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय तातडीने घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी करावी, ही आमची विनंती आहे", असे मीना कुर्लेकर यांनी नमूद केले.
-----------------------
महाराष्ट्र अनेक उपक्रमांचे प्रेरणास्रोत असल्याचा इतिहास आहे. एकल महिलांना सन्मान देण्यासाठी 'अभया'ची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे.'अभया' संबोधण्याबाबत राज्य शासनाने आदेश काढला, तर हे एक क्रांतिकारी पाऊल असेल. तसेच भविष्यात मा. राष्ट्रपती मुर्मू यांनी देशपातळीवर 'अभया' संबोधन लागू केल्यास, त्याची सुरुवात महाराष्ट्राने केल्याची नोंद होईल. असे झाल्यास 'अभया' उपक्रमासाठी देशात महाराष्ट्र राज्य आदर्श व अग्रेसर ठरेल, असा विश्वासही मीना कुर्लेकर यांनी व्यक्त केला.
-----------------------
-----------------------
Comments
Post a Comment