निष्ठावंतांना संधी द्या,काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक पर्वती मतदारसंघाच्या बैठकीत आबा बागुल यांच्यासाठी निर्धार
निष्ठावंतांना संधी द्या,काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक
पर्वती मतदारसंघाच्या बैठकीत आबा बागुल यांच्यासाठी निर्धार
पुणे
यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी निष्ठावंतांना संधी दिली पाहिजे,अन्यथा त्याचे विपरीत पडसाद सहाही विधानसभा मतदार संघात निश्चित उमटतील.अशी आक्रमक भूमिका घेत पर्वती विधानसभा मतदार संघातील सर्व ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करताना पक्ष श्रेष्ठींनी तत्काळ दखल घ्यावी अन्यथा तटस्थ राहण्याचा इशारा यावेळी पक्षाच्या निरीक्षक व अन्य पदाधिकाऱ्यांना दिला.
पुणे लोकसभा निवडणुकीसाठी पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या पर्वती विधानसभा मतदारसंघांची पूर्वनियोजित बैठक झाली.माजी उपमहापौर श्री. आबा बागुल यांनी या पूर्वनियोजित बैठकीचे आयोजन केले होते.मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीत जर निष्ठावंतांना डावलले जात असेल तर कार्य कसे करायचे असा थेट सवाल पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निरीक्षकांना विचारला. ज्यांनी आजवर पक्षाशी प्रामाणिकपणे राहून काम केले.त्यांनाच बाजूला सारण्याचे राजकारण होत असेल तर आता पक्षाच्या श्रेष्ठींनी निष्ठावंत म्हणजे काय ? याची व्याख्या जाहीररीत्या सांगावी.असे आव्हानही यावेळी भावना व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी दिले.कोणत्याही स्थितीत निष्ठावंतांना संधी मिळालीच पाहिजे तरच एकदिलाने काम केले जाईल असेही यावेळी पदाधिकाऱ्यांनी निरीक्षकांना थेट सांगितले.
याप्रसंगी माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांपासून मी समाजकारण आणि राजकारणात कार्यरत आहे.काँग्रेसचा निष्ठावंत आहे.सलग ३०वर्षे निवडून येत आहे आणि विकासाला सदैव प्राधान्य दिले आहे.पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळात रुजवली आहेत.यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षात मरगळ होती.त्यामुळे जाहीर सभा घ्या,आणि पुणेकरांचा कौल घेवून उमेदवार ठरवा हे पत्र दिले मात्र त्याला लेटर बॉम्बचे स्वरूप दिले मात्र काँग्रेस यंदाच्या निवडणुकीत आहे हे वातावरण निर्माण झाले.ते पत्र जर लेटर बॉम्ब होते मग आता पुढे पहा काय होते.पुढील भूमिका ही कार्यकर्ते,समर्थक ,मतदारांशी बोलून लवकरच ठरवली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.तसेच आताचे जे स्थानिक नेते आहेत.त्यांना पूर्वी कुणी थारा देत नव्हते.अशा नेत्यांची नावे विकासकामांच्या कोनशिलेवर माझ्याच आग्रहामुळे आयुष्यभर कोरली गेली.याची आठवणही आबा बागुल यांनी पक्षांतर्गत राजकारण करणाऱ्या स्थानिक नेत्यांना यावेळी करून दिली.
यावेळी निरीक्षक मुख्तार शेख, अभय छाजेड,द.स पोळेकर,मार्केटयार्ड ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे, पर्वती ब्लॉक अध्यक्ष संतोष पाटोळे ,सतीश पवार,इम्तियाज तांबोळी, इर्शाद शेख आदींसह पदाधिकारी - कार्यकर्ते तसेच तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष घनश्याम वाळुंजकर, संताजी प्रतिष्ठान कोथरूडचे अध्यक्ष रमेश भोज, प्रकाश कर्डिले,हरीश देशमाने,अप्पा खवळे, दिपक ओव्हाळ,ओबीसी सेल पर्वतीचे अध्यक्ष रफिकभाई अलमेल,विनायक मुळे,जयकुमार ठोंबरे,पुणे पीपल्स बँकेच्या संचालिका निशा करपे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Comments
Post a Comment