शिवतांडव' या ऐतिहासिक नाटकाचा गुरुवारी शुभारंभ*
*'शिवतांडव' या ऐतिहासिक नाटकाचा गुरुवारी शुभारंभ*
*- तब्बल ९ गाण्यांचा समावेश असलेले भव्यदिव्य नाटक*
*- भाऊसाहेब भोईर यांच्या मोरया थिएटर्सची निर्मिती*
पुणे/ पिंपरी : भव्य दिव्य नेपथ्य,३७ कलाकारांचा ताफा, तब्बल ९ गाणी यामधून महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास मराठी रंगमंचावर उलगडणार आहे. भाऊसाहेब भोईर यांच्या मोरया थिएटर्सची निर्मिती असलेल्या या नाटकाचे नाव 'शिवतांडव' असे असून याचा शुभारंभाचा प्रयोग येत्या गुरुवारी (२८ मार्च २०२४) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात रंगणार आहे. व्यावसायिक मराठी नाटकांच्या इतिहासात 'शिवतांडव' च्या निमित्ताने पहिल्यांदाच शुभारंभाच्या प्रयोगांचा मान पिंपरी चिंचवड शहराला मिळणार आहे.
नाटकाबद्दल बोलताना दिग्दर्शक दिलीप भोसले म्हणाले, 'शिवतांडव' नाटकामधून शिवाजी महाराजांचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. ज्येष्ठ लेखक प्रताप गंगावणे यांनी नाटकाचे लेखन केले, रोहित नागभिडे यांचे संगीत आहे. नेपथ्य बाबा पार्सेकर यांचे असून सूत्रधार राजु बंग,भैरवनाथ शेरखाने आहेत. या नाटकात ९ गाणी असून प्रत्येक गाणे हे कथेला पुढे घेऊन जाणारे आहे. या नाटकाचे शीर्षक गीत मानसी धुले - भोईर यांनी गायले आहे. कव्वाली, लावणी, भजन अशी वैविध्यपूर्ण गाणी यात आहेत तसेच एक रॅप सॉन्ग देखील आम्ही तयार केले आहे.
नाटकाचे संगीतकार रोहित नागभिडे म्हणाले, चित्रपटाला आणि नाटकाला संगीत देणे यात मोठा फरक आहे. 'शिवतांडव' हे नाटक शिवरायांचा इतिहास उलगडत आहे यामुळे या नाटकाला संगीत देणे हे एक आव्हान आणि जबाबदारीचे काम यांची जाणीव ठेऊन नाटकाच्या संगीतावर काम केले आहे. या नाटकाचे पार्श्वसंगीत हे आजच्या काळाशी सुसंगत असे ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, तर नाटकातील गाण्यांचा बाज हा पारंपारिक संगीतांमधून साकाराण्यात आला आहे. आम्ही गाण्यांमध्ये डफली, चिमटा, संबळ, चिपळ्या अशा पारंपारिक वाद्यांचा वापर केला आहे, रेकॉर्डिंग करताना ही वाद्य की बोर्डावर न वाजवता प्रत्यक्ष त्या वाद्यांचा वापर केला आहे यामुळे रसिकांना वेगळा फील येणार आहे.
नाटकाचे निर्माते भाऊसाहेब भोईर म्हणाले, चित्रपट, नाटकाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना काहीतरी वेगळे देण्याचा मोरया थिएटर्स चा नेहमी प्रयत्न असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आजच्या पिढीला दाखवण्यासाठी आम्ही 'शिवतांडव' ची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. या नाटकाच्या पहिल्या प्रयोगा आधीच राज्याच्या विविध भागातून प्रयोगासाठी विचारणा होत आहे.
Comments
Post a Comment