स्वतंत्रते भगवते' कार्यक्रमातून उलगडल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता*
*'स्वतंत्रते भगवते' कार्यक्रमातून उलगडल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता*
*-स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनच्या वतीने आयोजित 'स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सव'चा समारोप*
पुणे : 'जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते! श्री महन्मंगले.. शिवास्पदे..शुभदे ... ', 'जय देव जय देव जय शिवराय..' ही छत्रपती शिवाजी महारांवरील आरती ते 'सागरा प्राण तळमळला..' या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या विररसाने भारलेल्या कवितांच्या सादरीकरणाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी करण्यात आली.
स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनच्या वतीने सावरकरांच्या जयंती निमित्त यंदा प्रथमच 'स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत आज 'स्वातंत्रते भगवते' या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वरचीत कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. पल्लवी वढवेकर बर्वे आणि श्रृती पटवर्धन यांनी हा कविता वाचन आणि त्यांच्या निरूपणचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाला प्रथम लवकर आलेल्या नागरिकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी अनुराधा पटवर्धन, संध्या हंबरडीकर, मेघश्याम देशपांडे, अमित गोखले, देवेंद्र वडके, श्रुती पटवर्धन आदि उपस्थित होते, तर स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रितम थोरवे यांनी प्रास्ताविक केले.
'जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते! श्री महन्मंगले.. शिवास्पदे..शुभदे ... ' या गाण्याने कार्यक्रमाची सुरेल सुरूवात झाली. त्यानंतर 'जय देव जय देव जय शिवराय..' ही छत्रपती शिवाजी महाराजांवरील आरती, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांच्या वरील पोवाडे, सिंहगडाचा पोवाडा, स्वदेशीचा फटका सादर करण्यात आला. विररस आणि प्रेमरसाने भरलेल्या या कवितांचे अंदमान पूर्व, अंदमान व अंदमान नंतरच्या कविता अशी विभागणी करण्यात आली होती. स्वातंत्रवीर सावरकरांची एक कविता आणि त्यांचे निरूपण यावेळी सादर करण्यात आले. सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगाडताना कवी म्हणून असलेले त्यांचे योगदान सादर होणाऱ्या प्रत्येक कवितेतून अधोरेखीत होत होते. यावेळी बालविधवा, काळ्या पाण्याची शिक्षा, अंदमानातून सुटका आदी प्रसंगी काव्याच्या माध्यमातून आलेले सावरकरांचे मत निरूपणा द्वारे सांगण्यात आले. 'सागरा प्राण तळमळला..' या कविता सादरीकरणाने उपस्थितांना भारावून टाकले.
Comments
Post a Comment