डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन; विज्ञान भारतीच्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनात 'अध्यात्म आणि विज्ञान'वर परिसंवाद
भारतामध्ये प्राचीन परंपरा, विज्ञान व तंत्रज्ञानाचा अनोखा त्रिवेणी संगम
डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन; विज्ञान भारतीच्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनात 'अध्यात्म आणि विज्ञान'वर परिसंवाद
पुणे, ता. २२ : "आपली प्राचीन समृध्द परंपरा आणि आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम घडवून भारतीयांनी गेल्या काही वर्षात जगासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे," असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान व पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज पुण्यात बोलताना केले.
विज्ञान भारतीच्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनात 'अध्यात्म आणि विज्ञान' या विषयावरील परिसंवादात डॉ. जितेंद्र सिंह यांनी आपले विचार मांडले. लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या प्रांगणातील विश्वशांती सभागृहात झालेल्या परिसंवादावेळी रामकृष्ण मठ पुणेचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंद, माजी संरक्षण सचिव डॉ. सतीश रेड्डी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड, विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शेखर मांडे आदी उपस्थित होते. या अधिवेशनात देशभरातून १५०० प्रतिनिधी उपस्थित आहेत.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, "भारताची आयुर्वेदासारखी प्राचीन विद्या कोरोना काळात खऱ्या अर्थाने उपयोगी पडली. कोरोनावर जगभर झालेल्या उपचार पद्धतीमध्ये आयुर्वेदिक औषधांचा प्रामुख्याने वापर केला गेला. गेल्या काही वर्षात जगभर विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती झाली असून, त्यात भारताचा सहभाग पहिल्या श्रेणीतील राहिला असल्याचे जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले. जागतिक पातळीवर संशोधन क्षेत्रात २०१४ मध्ये ८१ व्या क्रमांकावर असलेला भारत २०२२ मध्ये ४० व्या स्थानावर पोचला असून, त्यामध्ये स्टार्टअपसारख्या उद्योगांचा मोलाचा वाटा आहे."
"भारताला ७५० किलोमीटर लांबीचा समृध्द सागर किनारा लाभला आहे. समुद्र मंथनाचे नवे आव्हान स्वीकारण्यास आता आपण सज्ज झालो आहोत. या संशोधनातून खनिज, धातू आणि जैववैविध्यामध्ये, तसेच माशांच्या निर्यातीत भारत अग्रक्रमावर पोचेल. गेल्या १० वर्षात देशात विज्ञानप्रसारासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात भारताच्या या प्रगतीचा आलेख असाच चढता राहण्यासाठी खासगी आणि सरकारी क्षेत्रातील उद्योगांचे एकत्रीकरण, प्राचीन सामग्रीचा वापर आणि पारंपरिक ज्ञानाचा आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून वापर या तीन गोष्टी अत्यावश्यक आहेत," असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी नमूद केले.
स्वामी श्रीकांतानंद यांनी विज्ञान व अध्यात्मविषयी स्वामी विवेकानंद यांचे विचार मांडले. भारतीय संस्कृती, परंपरा, अध्यात्म आणि विज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यात त्यांनी मोठे योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले. विज्ञानाने प्रगती होत असली, तरी ती स्वार्थीपणाकडे घेऊन जाणारी आहे. त्यामुळे देशाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जात असतानाच संस्कार, संस्कृतीचे रक्षण होणे गरजेचे आहे. त्यामुळे विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून पुढे जायला हवे, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. सतीश रेड्डी म्हणाले की, "पूर्वी भारत संरक्षण क्षेत्रासाठी लागणारी उपकरणे, शस्त्रे आयात करत असे. गेल्या काही वर्षात भारतात मोठ्या प्रमाणावर संशोधन झाले असून, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया यांसारख्या उपक्रमामुळे आज आपण मिसाईल, शस्त्रे निर्मितीत स्वयंपूर्ण होऊन निर्यातही करू लागलो आहोत. अमेरिका, रशिया आणि चीननंतर प्रगत तंत्रज्ञान असलेला देश म्हणून भारताची ओळख झाली आहे. लढाऊ विमानांची निर्मिती आपण करत आहोत. संरक्षण क्षेत्रात आपण अधिक सक्षम व आत्मनिर्भर झालो आहोत."
सूत्रसंचालन विवेकानंद पै यांनी केले. मयांक बडजात्या यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment