डॉ. एस. सोमनाथ यांचे प्रतिपादन; विज्ञान भारतीच्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप

 परिवर्तनक्षम विज्ञान-तंत्रज्ञानाने राष्ट्राच्या प्रगती चालना

डॉ. एस. सोमनाथ यांचे प्रतिपादन; विज्ञान भारतीच्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप

पुणे, ता. २३ : "राष्ट्राच्या सर्वांगीण विकासात विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती महत्वपूर्ण ठरते. परिवर्तन घडविण्याची क्षमता असलेल्या विज्ञान-तंत्रज्ञानात भारताने गेल्या काही वर्षांत गगनभरारी घेतली असून, आपला देश आत्मनिर्भर होण्यासह प्रगत तंत्रज्ञानाने समृद्ध होत आहे," असे प्रतिपादन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इसरो) चेअरमन डॉ. एस. सोमनाथ यांनी केले.





 
विज्ञान भारतीच्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपावेळी डॉ. सोमनाथ बोलत होते. लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या प्रांगणातील विश्वशांती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड, विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शेखर मांडे, राष्ट्रीय संघटनमंत्री डॉ. शिवकुमार शर्मा, महासचिव विवेकानंद पै आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ. शांतीस्वरूप भटनागर यांच्यावरील पुस्तकाचे, सृष्टीज्ञान मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. एस. सोमनाथ म्हणाले, "शाश्वत विकासासह १४० कोटी देशवासीयांच्या प्रमुख गरजा भागविण्यात विज्ञान-तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. शिक्षणात संशोधन, इनोव्हेशन वाढवायला हवे. संस्थांमध्ये होणारे संशोधन उद्योगांशी संलग्नित झाले, त्यातून उत्पादकता वाढली, तर देशाच्या विकासाला अधिक चालना मिळेल. भारतीय अवकाश मोहिमांत आता ९५ टक्के उपकरणे स्वदेशी बनावटीची वापरली जात आहेत. सॅटेलाईटमधील काही भाग मात्र अजूनही आयात करावा लागत असून, येत्या काही वर्षात त्याचीही निर्मिती भारतीय बनावटीची असेल, असा विश्वास वाटतो. भारतीयांकडे ज्ञान, कौशल्य व क्षमता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे यामध्ये अधिक संशोधन व्हावे. जेणेकरून आपण प्रत्येक बाबतीत आत्मनिर्भर बनू शकू. विज्ञान भारतीने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जनजागृतीचे कार्य आणखी जोमाने पुढे न्यावे."

सुनील आंबेकर म्हणाले, "वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यात विज्ञान भारतीने आजवर मौलिक योगदान दिले आहे. आशा, उत्साह आणि विश्वास वाढवण्याचे हे कार्य यापुढेही निरंतर सुरु राहावे. विज्ञानामुळे भारत महत्वाकांक्षी, आकाशाला गवसणी घालणारे प्रकल्प यशस्वी होत आहेत. समाज, देशासमोरील अनेक समस्याचे निराकरण विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शक्य होत आहे."

शाश्वत विकास, पारंपरिक ऊर्जेचा वापर, ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन, प्रदूषणमुक्त भारत, हायड्रोजन एनर्जी, हरित ऊर्जा आदी विषयांवर डॉ. व्ही. के. सारस्वत यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सचिव डॉ. अरविंद रानडे यांनी सूत्रसंचालन यांनी केले. विवेकानंद पै यांनी अधिवेशनाच्या दोन दिवसांचा आढावा घेतला. राष्ट्रीय सचिव कॉम्पेला शास्त्री यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला