आठव्या आंतरराष्ट्रीय डेअरी व पशुखाद्य प्रदर्शनाचे उद्घाटन
आठव्या आंतरराष्ट्रीय डेअरी व पशुखाद्य प्रदर्शनाचे उद्घाटन
- शनिवारपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार; दूध उत्पादक शेतकरी, पोल्ट्री व्यावसायिकांना प्रगतीची संधी
पुणे : डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय डेअरी व पशुखाद्य प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी झाले. बेनिसन मीडियाच्या पुढाकारातून ऑटोक्लस्टर एक्झिबिशन सेंटर, पिंपरी पुणे येथे होत असलेले हे प्रदर्शन येत्या शनिवारपर्यंत (दि. २६) सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. या प्रदर्शनात जवळपास १०० दूध व दुग्धजन्य उत्पादने आणि यंत्रसामुग्री पुरवणाऱ्या कंपन्यांनी सहभाग घेतला आहे.
प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद मेश्राम, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ दूध) चेअरमन अरुण डोंगळे, जाफा कॉम्फीडचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद वाघ, द वर्ल्ड व्हेटर्नरी पोल्ट्री असोसिएशनचे डॉ. जितेंद्र वर्मा, पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशनचे वसंतकुमार शेट्टी, कंपाउंड लिव्हस्टॉक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे चेअरमन दिव्याकुमार गुलाटी, यांच्यासह संयोजक प्राची अरोरा व आनंद गोरड आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी डेअरी व पशुखाद्य निर्मिती व्यावसायिक, शेतकरी युवक, युवतींनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली.
डॉ. मिलिंद मेश्राम म्हणाले, "महाराष्ट्रात दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. दुधाचे उत्पादन व त्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी दुभत्या जनावरांचे आरोग्य चांगले ठेवणे गरजेचे असते. जनावरांना चांगला चारा, पौष्टिक पशुखाद्य देण्यासह त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेही महत्वाचे आहे. त्यामुळे नियमित लसीकरण, गरजेनुसार उपचार व्हायला हवेत."
अरुण डोंगळे म्हणाले, "डेअरी आणि पशुखाद्याची सुरक्षा घेऊन होत असलेले हे प्रदर्शन शेतकरी व शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. तंत्रज्ञान वेगाने बदलत असून, डेअरी व्यवसायाला पूरक आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आपण केला पाहिजे. गोकुळने दर्जा जपत संकलन वाढवले आहे. लाखो लिटर दुधाचे संकलन आणि हजारो शेतकरी बांधव गोकुळचे सभासद आहेत."
प्रकाश कुतवळ म्हणाले, "व्यवसायात नावीन्य असणे प्रगतीचे लक्षण आहे. डेअरीत चांगल्या दर्जाचे दूध मिळत नाही. दुधाच्या भेसळीवर चर्चा करण्यापेक्षा त्यावर काम करणे अधिक महत्वाचे आहे. सहकार आणि खासगी अशा दोन शाखा या क्षेत्रात काम करतात. एखादी डेअरी किती दूध संकलित करते, यापेक्षाही त्याचा दर्जा काय, हे जास्त महत्वाचे आहे."
प्राची अरोरा म्हणाल्या, "प्रदर्शनाचे आठवे वर्ष असून, यंदाची संकल्पना 'मिल्क अँड फीड सेफ्टी' अशी आहे. जनावरांचे आरोग्य व आहार व्यवस्थापन, डेअरी प्लांट मशीनरी, दूध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे आधुनिक तंत्रज्ञान, आईस्क्रीम व मिठाई उत्पादन, निर्यातीमधील संधी, पोल्ट्री, मत्स्य व पशुखाद्य मार्केट यावर तज्ज्ञांची मार्गदर्शन सत्रे, कार्यशाळा झाली."
प्रसाद वाघ यांनी दुधाच्या दर्जेदार उत्पादनात पशुखाद्य कसे महत्वाचे आहे, याविषयी माहिती दिली. वसंतकुमार शेट्टी यांनी पोल्ट्री उद्योगाविषयी आपले विचार मांडले. आनंद गोरड यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. जयाविजया राव यांनी सूत्रसंचालन केले. अश्वनीकुमार यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment