गीत ध्वनीमुद्रणाने सामाजिक चित्रपट 'निर्धार'चा मुहूर्त...

गीत ध्वनीमुद्रणाने सामाजिक चित्रपट 'निर्धार'चा मुहूर्त...

एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला आणि ती गोष्ट साध्य करण्याचा निर्धार केला की, अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. अशाच निर्धाराची गोष्ट 'निर्धार' या आगामी सामाजिक मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नुकताच गीत ध्वनीमुद्रणाने 'निर्धार' चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. आज समाज नव्हे, तर संपूर्ण देशाला पोखरणाऱ्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर हा चित्रपट भाष्य करतो. या चित्रपटातील तरुणांनी भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करण्याचा 'निर्धार' केला आहे. हा 'निर्धार' रुपेरी पडद्यावर सादर करण्याचे काम या चित्रपटाद्वारे निर्मात्यांनी केला आहे. देशातील ज्वलंत मुद्द्यावर भाष्य करण्याचा, किंबहुना तो कसा नष्ट होईल हे सांगण्याचा प्रयत्न 'निर्धार' या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखकांनी फार सुंदररित्या केला आहे.

जयलक्ष्मी क्रिएशन या निर्मिती संस्थेअंतर्गत निर्मात्या पद्मजा वालावलकर यांनी 'निर्धार' चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिलीप भोपळे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाचं लेखन दीनानाथ वालावलकर यांनी केलं आहे. जुहू येथील आजिवासन स्टुडिओमध्ये 'निर्धार'मधील महत्त्वपूर्ण गाणं रेकॅार्ड करून चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, गायक, संगीतकार, तंत्रज्ञ तसेच सिनेसृष्टीतील काही मान्यवर उपस्थित होते. गीतकार दीनानाथ वालावलकर यांनी लिहिलेलं 'दे ना शक्ती मातरम, वंदे मातरम...' हे गीत स्फूर्तीदायक आहे. गायक ओंकार सोनवणे, लयश्री वेणूगोपाल, मीरा सूर्या, आयुश तावडे, उत्तेज जाधव, प्रज्ञा जामसंडेकर यांनी गायलेलं हे गाणं संगीतकार राज पादारे यांनी संगीतबद्ध केलं आहे. 

समाजव्यवस्था आणि भ्रष्टाचार यांचं नातं अतूट आहे. पूर्वी शेकडो रुपयांमध्ये होणारा भ्रष्टाचार आज हजारो कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. दिवसेंदिवस भ्रष्टाचाररूपी राक्षस अधिकाधिक विक्राळ रूप धारण करत आहे. या राक्षसाला नेस्तनाबूत करण्याचं काम तरुणाईच करू शकते. 'निर्धार' या चित्रपटामध्येही अशाच तरुण पिढीची कथा पाहायला मिळणार आहे, जी भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करण्यासाठी संघर्ष करत समाजापुढे नवा आदर्श ठेवते. हा चित्रपट समस्त देशबांधव व रसिक जनांना स्फूर्ती देणार ठरेल असे मत निर्मात्या पद्मजा वालावलकर यांनी व्यक्त केलं आहे. दिग्दर्शक दिलीप भोपळे म्हणाले की, या चित्रपटाच्या वास्तवदर्शी कथेमध्ये एक स्फूर्तीदायक गीत असायला हवं याची जाणीव झाल्यानेच 'दे ना शक्ती मातरम...' या गीताचा समावेश करण्यात आला आहे. कथानकामध्ये जेव्हा नायक आणि त्यांच्या साथीदारांना शक्ती, प्रेरणा, उर्जा आणि स्फूर्तीची गरज असते, तेव्हा हे गीत चित्रपटात येतं. संगीतप्रेमींच्या ओठांवर अगदी सहज रुळेल असं हे गाणं चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावणारं असल्याचंही ते म्हणाले. 

डॅा. गिरीश ओक, सौरभ गोगटे, पल्लवी पटवर्धन, प्रज्ञा केळकर, मिलिंद ऊके, उमेश बोळके, अभिनव कुरणे, जान्हवी सावंत, ऋतुजा कनोजिया, अथर्व पाटील, श्रेयस मोहिते, दिनानाथ वालावलकर, युवराज झुगर, केतकी पाटील, आनंद पाटील, सुरेंद्र केतकर, विद्या डांगे, एन. डी. चौगुले आदी कलाकारांनी 'निर्धार'मध्ये विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. डिओपी अतुल सुपारे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, विकी बिडकर यांनी कला दिग्दर्शनाचं काम पाहिलं आहे. वेशभूषा प्रशांत पारकर यांनी, तर रंगभूषा अतुल शिधये यांनी केली आहे. सहदिग्दर्शक नंदू आचरेकर असून संतोष जाधव प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक आहेत. महेंद्र पाटील या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर असून संग्राम भालकर या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शक आहेत. कैलास भालेराव, अजय खाडे यांनी या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम पाहिलं आहे.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला