विद्यार्थ्यांनो मिळालेल्या संधीचे सोनं करा शैलेन्द्र गोस्वामी: 'एमआयटी एडीटी'त स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेचे उद्घाटन
विद्यार्थ्यांनो मिळालेल्या संधीचे सोनं करा
शैलेन्द्र गोस्वामी: 'एमआयटी एडीटी'त स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेचे उद्घाटन
पुणे : भारत सरकारच्या विविध योजनांमुळे देशातील विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना तसेच संशोधनाला बळ मिळत आहे. त्यात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोवेशन सेल व एआयसीटीई द्वारे आयोजित राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (एसआयएच) स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांना कल्पकता जगासमोर आणण्याची अनोखी संधी मिळत आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी तिचा पुरेपूर फायदा घेवून मिळालेल्या संधीचे सोनं करावे, असे मत पुष्कराज ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक शैलेन्द्र गोस्वामी यांनी मांडले.
ते एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणेच्या राज कपूर सभागृहात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीई द्वारे आयोजित राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२४ (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.
यावेळी, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेलचे नवोपक्रम अधिकारी अभिषेक रंजन, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, नोडल अधिकारी डाॅ.रेखा सुगंधी, डाॅ.निशांत टिकेकर, प्रा.सुरेश कापरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच, भारत सरकारकडून दूरदृष्टी प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या उद्घाटनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, एआयसीटीई चेअरमन टी.जी. सितारामन, डाॅ.अभय जेरे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
गोस्वामी पुढे म्हणाले की, सध्या देशासमोर असणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संशोधनाला चालना देण्याचे काम स्मार्ट इंडिया हॅकेथाॅन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. त्यासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत,असे म्हणत त्यांनी कौतुकही केले.
यावेळी अभिषेक रंजन यांनी देखील विद्यापीठातील सुविधांचे व स्पर्धेच्या अचूक नियोजनाचे कौतुक करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या आयोजनात कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, डाॅ.सुनीता कराड यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पाँडेचेरी, कर्नाटक, केरळ, चंडीगढ, जम्मू-काश्मिर, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांतील २९ संघांचे विद्यार्थी सहभागी झाले असून पुढील चार दिवस स्पर्धेतून विद्यार्थी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.दुबे यांनी तर आभार डाॅ.टिकेकर यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा.स्नेहा वाघटकर यांनी केले.
चौकट
पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी संवाद
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नेहमीप्रमाणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विकसीत भारत@२०४७ या संकल्पनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच एमआयटी एडीटी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी त्यांना आपल्या कल्पना व समस्यांवर त्यांनी शोधलेले उपाय ऐकवताना काही प्रश्न देखील विचारले. ज्याला पंतप्रधानांनी समर्पकपणे उत्तरे देत प्रोत्साहित केले.
Comments
Post a Comment