एमपॉवर’ आणि सीआयएसएफ यांच्यातील सामंजस्य कराराला आणखी तीन वर्षांची मुदतवाढ
‘एमपॉवर’ आणि सीआयएसएफ यांच्यातील सामंजस्य कराराला आणखी तीन वर्षांची मुदतवाढ
‘प्रोजेक्ट मन’अंतर्गत २१ शहरांमध्ये समुपदेशकांची नियुक्ती; त्यामुळे ‘सीआयएसएफ’चे जवान व त्यांच्या कुटुंबियांना अधिक व्यापक लाभ
आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा सामाजिक उपक्रम असलेल्या एमपॉवर या संस्थेसोबत असलेला सामंजस्य करार (एमओयू) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) आणखी तीन वर्षांसाठी वाढविला आहे. दि. ११ सप्टेंबर रोजी या कराराचे नूतनीकरण करण्यात आले. ‘एमपॉवर’च्या अध्यक्षा नीरजा बिर्ला यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘प्रोजेक्ट मन’ या मानसिक आरोग्य उपक्रमाचा आतापर्यंत आलेला यशस्वी अनुभव या निर्णयामागे आहे.
‘प्रोजेक्ट मन’साठीचा पहिला करार नोव्हेंबर २०२४मध्ये एमपॉवर व सीआयएसएफ यांच्यात एका वर्षासाठी झाला होता. त्या कालावधीत तब्बल ७५,०००पेक्षा अधिक जवानांना व त्यांच्या कुटुंबियांना व्यावसायिक समुपदेशनाचा लाभ मिळाला. या काळात ‘सीआयएसएफ’मधील आत्महत्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी झालेले आढळले.
सध्या देशात असलेल्या ‘सीआयएसएफ’च्या १३ क्षेत्रांमध्ये ‘एमपॉवर’चे २३ समुपदेशक व क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ सेवा देत आहेत. आताच्या या करारवाढीमुळे समुपदेशकांची ही संख्या ३०वर नेण्यात येणार असून पाटणा, अहमदाबाद, प्रयागराज, भोपाळ / इंदौर, जम्मू, चंदीगड, जयपूर व कोची या नव्या केंद्रांमध्येही सेवा उपलब्ध होणार आहेत.
‘प्रोजेक्ट मन’च्या फायद्यांना सर्व स्तरांवर मान्यता मिळाली आहे. मानसिक आरोग्याविषयीची कलंकित दृष्टी कमी होणे, वेळेवर मदत घेण्याची प्रवृत्ती वाढणे, भावनिक प्रतिकारशक्ती आणि समस्यांचा सामना करण्याची क्षमता बळकट होणे, दुर्गम किंवा उच्च सुरक्षा क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण सेवा उपलब्ध होणे तसेच अनुपस्थिती, मानसिक थकवा व दीर्घकालीन मानसिक समस्यांमध्ये घट होणे यांचा या फायद्यांमध्ये समावेश आहे.
कराराच्या नूतनीकरणप्रसंगी ‘सीआयएसएफ’चे महासंचालक आर. एस. भट्टी म्हणाले, “आमच्या जवानांचे आरोग्य आणि एकंदरीत कल्याण हा आमच्या कार्यक्षमततेचा मूळ आधार आहे. आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टसोबतच्या भागीदारीमुळे आमचे दल मानसिकदृष्ट्या सक्षम, भावनिकदृष्ट्या खंबीर आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानांसाठी सदैव तयार राहील.”
‘एमपॉवर’च्या संस्थापिका व अध्यक्षा नीरजा बिर्ला म्हणाल्या, “मानसिक आरोग्य हे एकूणच जीवनाच्या आरोग्याचे केंद्र आहे असे आम्ही एमपॉवरमध्ये मानतो. सीआयएसएफसोबतची आमची भागीदारी अतिशय परिणामकारक ठरली आहे. आम्ही आमच्या सेवांचा विस्तार करून प्रत्येक जवान व त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्यास आणि त्याची काळजी घेत त्याला आधार देण्यास कटिबद्ध आहोत.”
मानसिकदृष्ट्या सुदृढ असे सुरक्षा दल घडविण्याचा सीआयएसएफ व एमपॉवर या दोन्ही संस्थांचा समान दृष्टीकोन या करारवाढीद्वारे अधोरेखित होत आहे. भारत सरकारच्या ‘टुगेदर फॉर मेंटल हेल्थ’ या कार्यक्रमाशी हा उपक्रम सुसंगत आहे.
(अजय दहिया)
उप महानिरीक्षक (गुप्तचर विभाग)
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल
Comments
Post a Comment