पुण्यातील जिगरबाज सायकलपटू आशिष जोशी यांचा अटकेपार झेंडा

पुण्यातील जिगरबाज सायकलपटू आशिष जोशी यांचा अटकेपार झेंडा
* मिग्लिया इटालिया शर्यत पूर्ण करण्यात यश
पुणे १२ सप्टेंबर २०२४: पुण्यातील जिगरबाज व अतिशय चिकाटीचे सायकलपटू म्हणून ओळख असलेल्या आशिष जोशी यांनी नुकतीच सोळाशे किलोमीटर अंतराची '1001 मिग्लिया इटालिया सायकलिंग शर्यत पूर्ण करीत अटकेपार झेंडा रोवला. पुण्यातील एकमेव आशिष जोशी यांच्यासह भारतातील सुमारे १२ सायकलपटू या शर्यतीत सहभागी झाले होते. 
लांबलचक व कठीण चढाई, धोकादायक उतार, सायकल चालविताना होणारे अपघात आणि डोंगराळ भागात नेटवर्क कमी असल्याने योग्य रस्ते पुन्हा शोधणे (री-रूटिंग) अशा अनेक आव्हानांसह अवघड भूप्रदेशातून मार्गक्रमण करत आशिष जोशी यांनी हे अंतर १४२ तासांत पूर्ण केले.
नियोजित वेळ हा १३४ तासांचा होता आणि या वेळेत ६ जणांनी हे अंतर पूर्ण केले,तर ३ जणांनी त्यानंतर हे अंतर पूर्ण केले. त्यातील आशिष जोशी हे एक होते. 

खूप शारीरिक श्रम आवश्यक असलेल्या 1001 मिग्लिया इटालिया या सायकलिंग उपक्रमाची संकल्पना फर्मो रिगामोंटी यांची आहे. एका दशकात सहा आवृत्त्या झाल्या आहेत ज्यात पाच खंडांहून अधिक आंतरराष्ट्रीय सायकलस्वार मोठ्या संख्येने सहभागी होतात. यावर्षी १६ ते २२ ऑगस्ट २०२४ दरम्यान सुमारे 700 सायकलस्वार सहभागी झाले होते.

व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आणि मुळतः सायकलिंग आवड असलेल्या ५० वर्षीय आशिष जोशी यांनी सांगितले की, ही स्पर्धा सर्वात जास्त लोकप्रिय व अवघड सायकलिंग स्पर्धांपैकी एक आहे. कोणत्याही बाह्य पाठिंब्याशिवाय अंतिम रेषा ओलांडणे आणि तुमची इच्छाशक्ती, सहनशक्ती आणि संयमाची परीक्षा घेणारी  ही स्पर्धा असते. आव्हानात्मक भूभाग व्यतिरिक्त, हा सुट्टीचा काळ होता, मार्गावरील गावे अक्षरशः रिकामी होती. त्यामुळे अन्न आणि पाणी मिळणे कठीण होते. याशिवाय बिघाड झाल्यास सायकल दुरुस्ती देखील सहज शक्य नव्हती. दिवसभर ३६ अंशांपर्यंत वाढत असलेले तापमान आणि रात्री थंडी अधून मधून पाऊस या सर्व गोष्टींमुळे आव्हाने वाढत होती. या डोंगराळ प्रदेशात नेटवर्क कनेक्टिव्हिटी कमी योग्य मार्ग शोधणे कठीण होते. मात्र हे अंतर पूर्ण केल्यावर मला प्रचंड आनंद आणि समाधान मिळाले. 

संयोजकांनी आशिष जोशी यांना शर्यत पूर्ण केल्याबद्दल आणि अत्यंत सहनशीलता आणि कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल पदक प्रदान केले.

याआधी, आशिष जोशी हे २०१३, २०१७, २०२२ मध्ये लंडन-एडेनबर्ग- लंडन (१५३५ किमी) मध्ये सहभागी झाले होते.  तसेच त्यांनी २०१७ मध्ये निर्धारित वेळेत हे अंतर पूर्ण केले होते. पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस या १२३५ किमी लांब अंतराच्या सायकलिंग स्पर्धेतही त्यांनी भाग घेतला होता.

Comments

Popular posts from this blog

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला

*ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्नांसाठी परिवहन आयुक्त कार्यालय ,मुंबई येथे बैठक*संपन्न*