
वारकऱ्यांचा 'जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार 2024' ने सन्मान पुणे : हाती भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन अन हातात टाळ - मृदुंग घेत वैष्णवांचा मेळावा आज पुण्य नगरीत दाखल झाला. या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने वारकरी संप्रदाय, सामाजिक, कला, संत सेवेकरी, भजन - कीर्तन गायन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या वारकऱ्यांना 'जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार 2024' देवून सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रख्यात पखवाज वादक ह. भ. प. प्रकाश निंबाळकर, कीर्तनकार ह. भ. प. रतनबाई निंबाळकर, भजन - कीर्तन गायक ह. भ. प. संजय बहिरट, भजन गायक ह. भ. प. कमलाकर महाबळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम मोरे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पालखी विसावा बोपोडी, मेट्रो स्टेशन जवळ आज (रविवार, दि. 30) पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यास माजी उपमहापौर सुनीता वाडेकर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे महार...